Spread the love

‘नशामुक्त युवा–विकसित भारत’साठी भुसावळमध्ये जनजागृती

३०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ; १० विद्यार्थ्यांची ‘ड्रग वॉरियर’ म्हणून निवड

भुसावळ, दि. १८ सप्टेंबर २०२६ : मेरा युवा भारत, जळगाव आणि जळगाव जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, पोलीस उपविभागीय कार्यालय, भुसावळ तसेच श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने ‘नशामुक्त युवा–विकसित भारत संकल्प अभियान’ आणि ‘मिशन RISE’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांच्या हस्ते झाले.

यावेळी केदार बारबोले यांनी विद्यार्थ्यांना NDPS Act मधील कायदेशीर तरतुदी, अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचे गांभीर्य तसेच युवकांशी निगडित विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रोबेशनरी डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस प्रशांत दरेकर यांनी युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच आपल्या मित्रपरिवारालाही व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली जगताप यांनी PPT च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अमली पदार्थांची माहिती देत त्यांचे शारीरिक व मानसिक परिणाम, NDPS Act मधील तरतुदी, नशेपासून बचावाच्या उपाययोजना, उपलब्ध हेल्पलाईन तसेच नशामुक्त भारत अभियानात युवकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहून शिक्षण, कौशल्यविकास आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरा युवा भारत स्वयंसेवक कमलेश सोनावणे यांनी केले, तर स्वयंसेवक कृष्णा पुरोहित यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. यावेळी मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, महाविद्यालयाचे प्रा. गिरीश कुलकर्णीप्रा. राम अग्रवाल यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्तीची शपथ घेतली. त्यापैकी १० विद्यार्थ्यांची ‘ड्रग वॉरियर’ म्हणून निवड करण्यात आली. हे विद्यार्थी आगामी काळात ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम राबविणे, युवकांमध्ये नशामुक्तीचा संदेश पोहोचविणे तसेच आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका बजावणार आहेत.

‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देत युवकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावावी, असा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version