पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७६वा वाढदिवस ‘सेवा संकल्प अभियाना’ने साजरा
जिल्हा रुग्णालयात अन्नदान व फळवाटप; भाजप कार्यालयात महाआरती, ७५ दिव्यांनी अभिवादन
जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त भाजप जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत विविध सेवा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अभियानांतर्गत सर्वप्रथम सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे गरीब व गरजू रुग्णांना अन्नदान तसेच फळवाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता जी.एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात गणपतीची महाआरती करण्यात आली. यावेळी ७५ दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात वाढदिवसाचा उत्साह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, माजी महापौर सीमा भोळे, माजी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, कार्यक्रमाचे संयोजक दीपक परदेशी, उदय भालेराव यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— मनोज भांडारकर
जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
