‘खाकी पलीकडचे जीवन’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृती, मानसिकता आणि कौटुंबिक जीवनाचा मानसशास्त्रीय वेध
पाचोरा, दि. १८ सप्टेंबर २०२६ : एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुवर्णा पाटील लिखित ‘खाकी पलीकडचे जीवन : पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा आणि कुटुंब जीवनाचा मानसशास्त्रीय वेध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पी.टी.सी. संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासो व्ही.टी. जोशी, संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले आणि उपप्राचार्य डॉ. जे.व्ही. पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीसोबतच त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक जीवनाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण, अनिश्चित स्वरूपाचे कर्तव्य, कर्तव्य आणि कौटुंबिक जीवनातील समतोल तसेच पोलीस पत्नी, मुले आणि कुटुंबीयांचे अनुभव यांचा संवेदनशीलतेने विचार करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनात्मक माहितीबरोबरच केस स्टडी, अनुभवकथन आणि भावनिक प्रसंगांच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनातील मानवी पैलू उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कुटुंबाच्या निःशब्द योगदानालाही पुस्तकातून अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. सुवर्णा पाटील या पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. पोलीस कुटुंबाचा एक भाग म्हणून अनुभवलेले वास्तव, निरीक्षणे आणि संशोधनात्मक दृष्टिकोन यांची सांगड घालत त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना, जबाबदाऱ्या आणि समायोजनाचे पैलूही पुस्तकातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
डॉ. सुवर्णा पाटील या सेवानिवृत्त सहायक फौजदार सुभाष सर्जेराव पाटील यांच्या कन्या असून, पोलीस कुटुंबातील अनुभव आणि शैक्षणिक-संशोधनात्मक दृष्टिकोन यामुळे पुस्तकाला विशेष संदर्भ प्राप्त झाला आहे.
प्रकाशन सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. सुवर्णा पाटील यांच्या पुस्तक लेखनाचे कौतुक करून त्यांच्या पुढील संशोधनात्मक व साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
