जावळे येथे परदेशी, राजपूत समाजातील ५२ गुणवंतांचा गुणगौरव
परदेशी-राजपूत समाज उन्नती मंडळाची वार्षिक आमसभा उत्साहात; मंगल कार्यालयासाठी समाजबांधवांना आर्थिक मदतीचे आवाहन
भडगाव : गणेश रावळ (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथील परदेशी-राजपूत समाज उन्नती मंडळाची वार्षिक आमसभा जावळे येथे रविवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी विविध परीक्षांमध्ये यश संपादन करणारे समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. एकूण ५२ गुणवंतांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मिनेश भगवान आणि महाराणा प्रताप यांच्या प्रतिमांचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकातून संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. कर्तारसिंग परदेशी यांनी उन्नती मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. जावळे येथे सुरू असलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी समाजबांधवांनी आर्थिक मदत करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बांधव संदीप परदेशी (दिघी), विनोद परदेशी (नागद) आणि कैलास परदेशी (दिघी) यांनी केले. यावेळी बहाळ येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयसिंग थानसिंग परदेशी यांनी देशभक्तिपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
सभेचा अहवाल वाचन संचालक सुभाष मन्नुसिंग महाजन यांनी केले. यावेळी डॉ. रविंद्र परदेशी (वाघले), कुणाल परदेशी (नागद), हभप ज्ञानेश्वर माऊली (सातगाव) यांच्यासह समाजबांधव, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात भरतसिंग छानवाळ यांनी सांगितले की, समाजाच्या मंगल कार्यालयासाठी जावळे येथील भगवान परदेशी आणि गोरख परदेशी यांच्या कुटुंबीयांनी जमीन विनामूल्य दिली आहे. या जागेवर मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू झाले असून, उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी समाजबांधवांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गुणगौरव झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि समाजबांधवांचे अभिनंदन केले. आभार अॅड. हिरालाल परदेशी यांनी मानले.
मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी देणगी देणाऱ्या समाजबांधव तसेच महिलांचाही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सचिव निलेश परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला. चाळीसगाव येथील साईराज ऑर्केस्ट्राचे संचालक विनोद परदेशी यांनी वाढदिवसानिमित्त गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी कन्नडचे माजी आमदार उदयसिंग राजपूत, नागदचे माजी जिल्हा परिषद सदस्य सरदारसिंग शिरा, डॉ. दिलीपसिंग राजपूत, सिनेट सदस्य भगवानसिंग डोभाळ, आरवली फाऊंडेशनचे अध्यक्ष महिपालसिंग चांदा, शिवसेना तालुका उपप्रमुख संजय गोठवाळ यांच्यासह विविध पदाधिकारी, समाजाचे प्रतिनिधी, सभासद, महिला आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जावळे येथील मुकेश मित्र मंडळ व ग्रामस्थ, तसेच सुनील राजपूत (बाणगाव), अमोल राजपूत, अनिल राजपूत, राकेश राजपूत यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
