प्रवक्ता अकॅडमीत ‘आनंद मेळावा’ आणि गणेशोत्सव उत्साहात
विद्यार्थ्यांनी उभारले विविध खाद्यपदार्थ व खेळांचे स्टॉल्स; व्यवसाय कौशल्य आणि व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव
कासोदा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाचे औचित्य साधून कासोदा येथील प्रवक्ता अकॅडमीमध्ये ‘आनंद मेळाव्या’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध खाद्यपदार्थ तसेच मनोरंजनात्मक खेळांचे आकर्षक स्टॉल्स उभारले. त्यामुळे अकॅडमीच्या परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवक्ता अकॅडमीच्या संचालिका सौ. अंकिता पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन व आरती करून करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी अभ्यास पुरेसा नसून, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून त्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळते. आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य, व्यवस्थापन, नियोजन आणि परस्पर सहकार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध चविष्ट व खमंग खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. त्यासोबतच विविध खेळांचे स्टॉल्सही आकर्षणाचे केंद्र ठरले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्टॉल्सची सजावट, खाद्यपदार्थांची मांडणी आणि विक्रीचे नियोजन अत्यंत उत्साहाने केले होते.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून केवळ खाद्यपदार्थांची विक्रीच केली नाही, तर खर्चाचे नियोजन, किंमत ठरविणे, ग्राहकांशी संवाद, टीमवर्क आणि व्यवस्थापन यांसारख्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मित्र-मैत्रिणींसोबत गणेशोत्सवाचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी मेळाव्यात मनसोक्त सहभाग नोंदविला.
अकॅडमीतील शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनीही विविध स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण अकॅडमी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
हा आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यवस्थापन कौशल्यांना व्यासपीठ मिळाले.
