पर्यावरणपूरकतेचा वस्तुपाठ! महापौर दीपमाला काळे यांच्या घरच्या गणरायाचे विधिवत विसर्जन
निर्माल्य प्लास्टिक पिशवीऐवजी कागदात; कृतीतून दिला प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा संदेश
जळगाव : ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ या आवाहनाला केवळ शब्दांपुरते मर्यादित न ठेवता कृतीतून त्याचा आदर्श घालून देत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या घरच्या श्री गणेशाचे पाचव्या दिवशी पर्यावरणपूरक पद्धतीने विधिवत विसर्जन केले. त्यांच्या या उपक्रमातून गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
महाआरतीनंतर महापौरांच्या निवासस्थानी गच्चीवर मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापौरांचे चिरंजीव नीरज मनोज काळे यांच्या हस्ते हा विधी पार पडला. यावेळी बालगोपाल आणि कुटुंबीयांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला.
प्लास्टिकमुक्तीचा संदेश
गणेशमूर्तीच्या विसर्जनासोबतच निर्माल्य व्यवस्थापनातही पर्यावरणाची काळजी घेण्यात आली. पूजेनंतर उरलेले निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत न देता कागदामध्ये व्यवस्थित गुंडाळून अर्पण करण्यात आले. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळण्यासोबतच निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा संदेश देण्यात आला.
महापौर दीपमाला काळे यांनी गणेशोत्सवाच्या काळात शहरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर स्वतःच्या घरातील गणरायाचे विसर्जनही त्याच पद्धतीने करून त्यांनी आपल्या आवाहनाला कृतीची जोड दिली.
घरगुती गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून प्लास्टिकमुक्ती, निर्माल्य व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाचा संदेश दिल्याबद्दल महापौरांच्या या उपक्रमाचे नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.
