Spread the love

सेवा संकल्प सप्ताहात पाल शाळेत साकारली मानवी रांगोळी

३२४ विद्यार्थी, १२ शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक योगदानाचा दिला संदेश

पाल : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांमध्ये सेवा, स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक योगदानाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाल येथे सेवा संकल्प सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. १७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यविषयक मार्गदर्शन, ‘सेवा माझे योगदान’ या सत्रासह विविध शासकीय लाभाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.

सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. १८ सप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात आकर्षक मानवी रांगोळी साकारण्यात आली. या उपक्रमात शाळेतील तब्बल ३२४ विद्यार्थी, ९ शिक्षक आणि ३ अंशकालीन शिक्षक, अशा एकूण १२ शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र येत मानवी रांगोळी साकारून सेवा संकल्पाचा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचविला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुसुंबा केंद्राचे केंद्र समन्वयक भूषण चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक ज्ञानेश्वर मोरे, विजय पारधी, गजमल पाटील, दीपक सोनवणे, पवन निकम, महेंद्र चौधरी, सोनल भुगवड्या आणि काळू जाधव यांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेची सवय, आरोग्याबाबत जागरूकता आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने सेवा संकल्प सप्ताहातील विविध उपक्रम राबविले जात आहेत. पाल शाळेतील या अभिनव उपक्रमाचे पालक तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version