Spread the love

वाईतील सजग नागरिकांनी पोलिसांनाच बजावली कायदेशीर नोटीस!

ध्वनी प्रदूषण रोखण्यात हयगय झाल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनाही प्रत

भुसावळ : संघरत्न सपकाळे

गणेशोत्सवातील आगमन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट झाल्यानंतर आता विसर्जन मिरवणुकीतही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होण्याची शक्यता व्यक्त होत असताना वाईतील काही सजग नागरिकांनी थेट पोलिसांनाच कायदेशीर नोटीस बजावली आहे. गणेशोत्सव काळात निर्धारित ध्वनी मर्यादेचे पालन न झाल्यास किंवा ध्वनी प्रदूषण नियंत्रणात पोलिसांकडून हयगय झाल्यास न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे. नोटीसची प्रत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.

एरवी पोलिसांकडून नागरिकांना नोटीस बजावली जाते. मात्र, वाईतील नागरिकांनी पोलिसांनाच नोटीस बजावल्याने या प्रकाराची शहरात चर्चा सुरू झाली आहे. गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदूषण होऊ नये आणि कायद्याचे पालन व्हावे, यासाठी काही नागरिकांनी महिनाभरापासूनच प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून पोलिसांना कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागरिकांच्या वतीने अॅड. रामदास धनावडे यांनी वाई पोलिसांना ही नोटीस बजावली आहे. नोटीसवर दिलीप आफळे, शिवाजी जगताप, प्रशांत डोंगरे, भाऊ मेहता, प्रशांत नागपूरकर, प्रमोद भिसे, संतोष दोंड आणि जितेंद्र जाधव आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नोटीस नेमकी कोणत्या कलमान्वये?

ही नोटीस भारतीय दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ मधील कलम ८० अन्वये देण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सक्षम दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी कायद्याने आवश्यक असलेली पूर्वसूचना म्हणून या नोटीसीचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निर्धारित ध्वनी मर्यादेचा भंग झाल्यास संबंधित यंत्रणेविरुद्ध न्यायालयात कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार राहील, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना नागरिकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता पोलिस प्रशासनाकडून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version