Spread the love

जय जिजाऊ मित्र मंडळाच्या क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप

वक्तृत्व, गोणपाट शर्यत, फुगे फोडण्यासह विविध स्पर्धा; विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरव

बाभळे, ता. धरणगाव :

बाभळे येथील जय जिजाऊ मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप झाला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लहान मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने मंडळातर्फे दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

यंदाही वक्तृत्व स्पर्धा, गोणपाट शर्यत, डोक्याने फुगे फोडणे अशा विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः चिमुकल्यांनी गोणपाट शर्यतीत सहभागी होत मनसोक्त आनंद लुटला.

वक्तृत्व स्पर्धेत पार्थ पाटील प्रथम

आयोजित वक्तृत्व स्पर्धेत चि. पार्थ वाल्मीक पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. परी प्रशांत पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळविला. दोन्ही विजेत्या विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धा संपल्यानंतर विविध गटांतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणामुळे सहभागी चिमुकल्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.

‘गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा साधण्याचे काम’

यावेळी श्री. विजयकुमार पाटील यांनी जय जिजाऊ मित्र मंडळाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता, त्यातून सामाजिक एकोपा वाढविण्यासोबतच लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम मंडळ करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय जिजाऊ मित्र मंडळ, बाभळेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version