दिव्यांगांनी न्यूनगंड न ठेवता यशशिखर गाठावे : खासदार स्मिताताई वाघ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना पुनर्वसन साहित्याचे वाटप
जळगाव : एखादा अवयव कमी आहे म्हणून दिव्यांगांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता सकारात्मक विचाराने मोठे कार्य करून यशाचे शिखर गाठावे आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरावे, असे आवाहन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या एडीप (ADIP) योजनेंतर्गत भारतीय कृत्रिम अवयव निर्माण निगम (एलिम्को) आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या विशेष प्रयत्नातून सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन सभागृहात दिव्यांगांसाठी पुनर्वसन साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाभरातील दिव्यांग लाभार्थींची तपासणी करून अवघ्या पंधरा दिवसांत आवश्यक पुनर्वसन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेशजी (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त पी. एस. म्हस्के, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमालाताई काळे, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, प्रकाश बालानी, भाजपा दिव्यांग सेलचे संयोजक गणेश वाणी, एलिम्को मुंबईचे सहव्यवस्थापक कमलेश यादव, स्वयंदिप संस्थेच्या अध्यक्षा तथा उद्योजिका मीनाक्षीताई निकम, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अशासकीय सदस्य मुकुंद गोसावी, गणेश पाटील, अक्षय महाजन आदी उपस्थित होते.
शहरासह जिल्हाभरातील शासनाने निश्चित केलेल्या २१ प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थी तसेच मूकबधिर व मानसिक गतिमंद शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थींना बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकली, व्हीलचेअर, सीपी चेअर, वॉकर, कुबड्या, काठ्या, स्टिक, कर्णयंत्र, टी.एल.एम. किट आदी अत्याधुनिक पुनर्वसन साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलिम्कोचे सहव्यवस्थापक कमलेश यादव यांनी केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिव्यांगांच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, विविध शासकीय सेवा-सुविधांचा योग्य लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी लाभार्थींना मिळालेल्या साहित्याचा योग्य वापर करून छोटे-मोठे उद्योग उभारता येतील आणि त्यातून स्वावलंबी होता येईल, असे सांगितले. दिव्यांगांच्या विकासासाठी शासन व प्रशासन सदैव प्रयत्नशील असून, लोकप्रतिनिधी म्हणून दिव्यांग कल्याणासाठी आपण त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या मनोगतात अल्पावधीत दिव्यांगांची तपासणी करून आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“एखादा अवयव कमी आहे म्हणून मनात न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर दिव्यांग व्यक्ती मोठे कार्य करून समाजाला प्रेरणा देऊ शकते,” असे खासदार वाघ यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासन, एलिम्को, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (डीडीआरसी) आणि दिव्यांगांसाठी कार्यरत मुकुंद गोसावी यांच्यासह संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग क्षेत्रात कार्यरत मुकुंद गोसावी यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
