मामुराबादमध्ये उघडे चेंबर; दुर्घटनेला निमंत्रण!
‘श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा’जवळ ८ ते १० महिन्यांपासून धोकादायक स्थिती; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थ संतप्त
मामुराबाद (प्रतिनिधी) : गिरीश चौधरी
मामुराबाद गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ परिसरात रस्त्यावरील गटारीचे चेंबर गेल्या तब्बल ८ ते १० महिन्यांपासून उघडे असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी वारंवार सूचना आणि तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अपघाताची भीती; वाहनधारकांची कसरत
मुख्य रस्त्यावर आणि प्रवेशद्वाराच्या अगदी जवळच हे चेंबर उघडे असल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी उघडे चेंबर स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनाचा तोल जाऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पादचारी आणि परिसरातील रहिवाशांसाठीही हे उघडे चेंबर धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
‘दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’
गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावरील हा धोका कायम असतानाही त्याची दुरुस्ती का करण्यात आली नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी वेळोवेळी सूचना करूनही समस्या कायम असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
तातडीने चेंबर बंद करण्याची मागणी
उघड्या चेंबरमुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याने ग्रामपंचायतीने कोणताही विलंब न करता चेंबरची तातडीने दुरुस्ती करून ते मजबूत झाकणाने बंद करावे, तसेच रस्ता सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
आता ग्रामपंचायत प्रशासन या समस्येची कितपत तातडीने दखल घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
