Spread the love

पारोळ्यात ऊसतोड मजुराला बेदम मारहाण; ॲट्रॉसिटीसह BNS अंतर्गत गुन्हा दाखल

उचल रकमेच्या परतफेडीवरून वाद; लाकडी दांडक्याने मारहाणीत डाव्या मनगटाला फ्रॅक्चर, जातीवाचक शिवीगाळ व धमकीचा आरोप

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : ऊसतोडीसाठी घेतलेल्या उचल (ॲडव्हान्स) रकमेच्या परतफेडीवरून झालेल्या वादातून भिल्ल समाजातील एका मजुराला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना पारोळा तालुक्यातील राजवड येथे घडल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत मजुराच्या डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन रमेश सोनवणे (वय ३५, रा. बिलखेडा, ता. धरणगाव) यांनी ऊसतोडीच्या कामासाठी मुकादम जितेंद्र गोकुळ पाटील (रा. बोदर्डे, ता. पारोळा) यांच्याकडून ३० हजार रुपयांची उचल घेतली होती. मात्र कौटुंबिक कारणांमुळे दौंड येथे ऊसतोडीस जाणे शक्य नसल्याने ही रक्कम परत करण्याचे ठरले होते.

शेतात मारहाण केल्याचा आरोप

तक्रारीनुसार, १८ सप्टेंबर २०२६ रोजी राजवड, ता. पारोळा येथील शेतात गजानन सोनवणे काम करत असताना संशयित जितेंद्र पाटील तेथे आला. त्याने उचल रकमेची मागणी करत धमकी दिली आणि फिर्यादीला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.

बचाव करताना गजानन सोनवणे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. तसेच संशयिताने अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित कैलास पाटील व विकास सोनवणे यांनी मध्यस्थी करून मजुराची सुटका केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

रुग्णालयात उपचारानंतर पोलिसांत फिर्याद

जखमी गजानन सोनवणे यांच्यावर प्रथम धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर २० सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसांनी संशयित जितेंद्र गोकुळ पाटील यांच्याविरुद्ध BNS कलम ११७(३), ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२), २९६ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version