Spread the love

नशिराबाद येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिसांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

‘नॉईज लेव्हल मीटर’द्वारे डीजे व बँडच्या आवाजाचे मोजमाप

नशिराबाद (प्रतिनिधी) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘नॉईज लेव्हल मीटर’द्वारे डीजे व बँडच्या आवाजाची डेसिबल पातळी मोजण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.

नशिराबाद येथील पेठ भागात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पोलिसांकडून प्रत्यक्ष डेमो

मिरवणुकीत बँड तसेच डीजे सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी स्वतः ‘नॉईज लेव्हल मीटर’ उपकरणाचा वापर करून आवाजाची डेसिबल पातळी कशा पद्धतीने मोजली जाते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

हे प्रात्यक्षिक कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी नसून उपकरणाची कार्यक्षमता तपासणे तसेच उत्सवादरम्यान ध्वनीची पातळी प्रत्यक्ष कशी नोंदवली जाते, याबाबत नागरिक व संबंधितांना माहिती देण्याच्या उद्देशाने घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

डीजे व बँड चालकांना नियमपालनाचे निर्देश

प्रात्यक्षिकानंतर पोलीस प्रशासनाने गणेश मंडळे, डीजे चालक, ध्वनिक्षेपक मालक आणि बँड पथकांना ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला.

शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे किंवा बँड वाजविल्यास संबंधित साऊंड सिस्टीम, ॲम्प्लीफायर्स व वाहने जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्यास केवळ डीजे चालकावरच नव्हे, तर संबंधित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

शांतता क्षेत्र व वेळेच्या नियमांचे पालन आवश्यक

शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन) तसेच निवासी भागातील ध्वनी मर्यादा आणि ध्वनिक्षेपणाच्या वेळेसंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. उत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

‘उत्सव आनंदात, पण नियमांचे पालन करून साजरा करा’

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, उत्सव सर्वांनी आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरा करावा. आवाजाच्या अतिरेकामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिक तसेच सर्व गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version