Spread the love

सुधाकर नगर शिवारात विहिरीतील मोटर, केबल व स्टार्टर कंट्रोलरची चोरी!

४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोराविरुद्ध पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल

पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील सुधाकर नगर शिवारातील शेतातील विहिरीतून अज्ञात चोरट्याने ५ एच.पी. क्षमतेची सिब्बल कंपनीची जुनी सबमर्सिबल मोटार, केबल वायर आणि स्टार्टर कंट्रोलर असा एकूण ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसमणी येथील शेतकरी किशोर गोकुळ पाटील (वय ५०) यांचे सुधाकर नगर शिवारातील गट क्रमांक १७६ मध्ये शेत आहे. १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या शेतातील विहिरीतून मोटार व इतर साहित्य लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये सुमारे ३ हजार ५०० रुपये किमतीची ५ एच.पी. क्षमतेची ‘सिब्बल’ कंपनीची जुनी सबमर्सिबल मोटार, १ हजार २०० रुपये किमतीची केबल वायर तसेच स्टार्टर कंट्रोलरचा समावेश आहे. अज्ञात चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने हे साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

शेतातील विहिरीची मोटार व केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर किशोर पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश साळुंखे करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version