सेवा संकल्प अभियानांतर्गत बोरअजंटी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
आरोग्य तपासणीसह विद्यार्थ्यांना स्वच्छता, पोषण व संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन
चोपडा | प्रतिनिधी : राहुल पाटील
बोरअजंटी, ता. चोपडा, जि. जळगाव : सेवा संकल्प अभियानांतर्गत धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बोरअजंटी येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या आरोग्य तपासणी शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र, वैजापूर येथील श्रीमती सोनाली पाटील व श्रीमती अमृता फटकाळ, आरोग्य सेविका तसेच श्री. घनश्याम बेलदार, आरोग्य सेवक यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी, पोषण, संतुलित आहार, स्वच्छ परिसर आणि आरोग्यदायी जीवनशैली यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासह आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही आरोग्य तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्यविषयक समस्या असल्यास त्या लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या वतीने आरोग्य तपासणीसाठी उपस्थित राहिलेल्या आरोग्य पथकाचे आभार मानण्यात आले.
‘निरोगी विद्यार्थी – सक्षम विद्यार्थी’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे आरोग्य तपासणी व समुपदेशन शिबिर विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक जाणीवा वाढविण्यासाठी उपयुक्त ठरले.
