Spread the love

हृदयस्पर्शी कवितेने उपस्थितांचे डोळे पाणावले

हाळगाव येथे कालकथित शालन नानासाहेब रंधवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण अभिवादन

अहिल्यानगर प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार

अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील रहिवासी कालकथित शालन नानासाहेब रंधवे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम रविवारी (दि. २० सप्टेंबर) अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित शालन नानासाहेब रंधवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

शालन नानासाहेब रंधवे यांनी कष्टाळू वृत्ती, जिद्द आणि स्वतःच्या मेहनतीच्या बळावर शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे घोडेस्वार व रंधवे परिवारावर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमादरम्यान भाऊसाहेब आहिर सर, प्रदीप आहिर तसेच भाऊसाहेब घोडेस्वार यांनी आपल्या भावना व्यक्त करून कालकथित शालन रंधवे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हृदयस्पर्शी कवितेने वातावरण झाले भावुक

पुण्यस्मरण कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण बोद्धाचार्य अनिकेत श्रीकांत गायकवाड (बॉडीबिल्डर) यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी कवितेमुळे अनुभवायला मिळाला. आई-वडिलांप्रती असलेले प्रेम, त्यांच्या आठवणी आणि व्यक्त न करता येणाऱ्या भावनांना त्यांनी कवितेतून शब्दरूप दिले.

आईच्या हातच्या साध्या जेवणाची चव, वडिलांची प्रेमळ साथ, बालपणीच्या आठवणी, आईने आंघोळ घालण्यापासून ते वडिलांनी बोट धरून चालायला शिकवण्यापर्यंतचा भावनिक प्रवास कवितेतून उलगडला. मोठे झाल्यानंतर आई-वडिलांप्रतीचे प्रेम व्यक्त करताना वाटणारी संकोचाची भावना आणि शेवटी आई-वडिलांच्या अस्तित्वाशी जोडलेली मातीची उपमा या कवितेतून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली.

“झाड कितीही मोठे झाले, तरी त्याला मातीशिवाय अस्तित्व नाही,” या भावनेने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. कविता ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि काही क्षण कार्यक्रमस्थळी भावुक शांतता पसरली.

आठवणींतून शालन रंधवे यांना आदरांजली

पुण्यस्मरण कार्यक्रमाला हाळगाव तसेच परिसरातील ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि रंधवे व घोडेस्वार परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत शालन रंधवे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आणि प्रेमळ स्वभावाचा स्मरणपूर्वक गौरव केला. भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version