Spread the love

नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या हस्ते दत्त कॉलनीत भव्य महाआरती

‘दत्ताचे चिमुकले गणेश मित्र मंडळा’तर्फे भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव उत्साहात; शितल सोनार यांचा वाढदिवसही साजरा

पाचोरा : प्रतिनिधी — पाचोरा शहरातील दत्त कॉलनी येथे ‘दत्ताचे चिमुकले गणेश मित्र मंडळा’तर्फे गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनीता ताई किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी परिसरातील महिला, नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दत्ताचे चिमुकले गणेश मित्र मंडळ’ गेल्या ११ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबवत आहे. यंदाही मंडळाने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, महाआरतीच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

गणपती बाप्पाच्या चरणी श्रद्धेने केलेली प्रार्थना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच भक्तिभावातून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली. आरतीनंतर उपस्थित भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.

पुढील वर्षी आ. किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीची प्रार्थना

यावेळी मंडळाच्या वतीने पुढील वर्षीच्या महाआरतीसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळात जबाबदारी स्वीकारल्यानंतर उपस्थित राहावे, अशी प्रार्थना करण्यात आली. मंडळाच्या या भावनेला उपस्थितांनी दाद दिली.

दरम्यान, वैष्णवी ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. शितल बंडू सोनार यांचा वाढदिवसही यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version