Spread the love

गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या रिक्षावर दगडफेक; चौघी महिला जखमी

रावेरमध्ये तणावाचे वातावरण; १४ जणांविरुद्ध दंगल व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

रावेर | प्रतिनिधी अक्षय वाघ : रावेर शहरातील आंबेडकरनगर परिसरात घरगुती गणपती विसर्जनासाठी रिक्षाने जात असलेल्या नागरिकांना रस्ता अडवून विरोध केल्यानंतर दगडफेक झाल्याची घटना शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेत चार महिला जखमी झाल्या असून, याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात १४ जणांविरुद्ध दंगल, रस्ता अडवणे, दगडफेक तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

आंबेडकरनगर येथील लताबाई ईश्वर घेटे या कुटुंबीयांसह घरगुती गणपती विसर्जनासाठी रिक्षाने पुनखेडा येथील भोकर नदीपात्राकडे जात होत्या. त्यांच्या घराकडून जाणारा मार्ग रजा कॉलनीतून जातो. शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास रिक्षा या परिसरातून जात असताना काही महिला व पुरुषांनी रिक्षा अडवून या मार्गाने गणपती विसर्जनासाठी नेण्यास विरोध केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

वाद वाढल्यानंतर दगडफेक

रस्ता अडवून विरोध केल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर एका गटाकडून रिक्षा तसेच गणपती विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत दिपाली घेटे, उज्ज्वला घेटे, लताबाई घेटे आणि संध्या घेटे या चार महिला जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर लताबाई घेटे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

१४ जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत शेख जमीर शेख उस्मान, इब्राहिम इरफान, इरफान उमर शेख, रईस हॉटेलवाला आणि मोईन रईस हॉटेलवाला यांच्यासह एकूण १४ जणांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध दंगल, रस्ता अडवणे, दगडफेक आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस कुमक तैनात

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जळगावहून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. निंभोरा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह अतिरिक्त पोलिस कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, घटनेत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका, दगडफेकीचे नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version