Spread the love

नाहाटा महाविद्यालयात बी.ए. फ्रेशर पार्टी उत्साहात

नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; नृत्य, मिमिक्री व विविध मनोरंजनात्मक खेळांनी रंगत

भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा महाविद्यालयातील मानव्यविद्या शाखेच्या प्रथम वर्ष बी.ए. वर्गात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘फ्रेशर पार्टी’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन जीवन आनंददायी वातावरणात सुरू व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, तर प्रमुख वक्ते म्हणून मानव्यविद्या शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवर व प्राध्यापकांच्या हस्ते सरस्वती पूजन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ. डी. एन. पाटील यांनी प्रथम वर्ष मानव्यविद्या शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवनातील संधींचा योग्य उपयोग करून शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. जी. आर. वाणी यांनी मानव्यविद्या शाखेचे महत्त्व अधोरेखित केले. भाषा, संस्कृती, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, संगीत आणि तत्त्वज्ञान अशा विविध विषयांचा एकत्रित अभ्यास विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा व्यापक करतो. भारतीय प्रशासकीय सेवेसह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या घडणीत मानव्यविद्या शाखेचे शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. प्रणाली हिवरे, अभिजित देहाडे आणि पूनम ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच समूह नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर मिमिक्रीसह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

फ्रेशर पार्टीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, फुगे फोडणे, स्टिकर काढणे आदी विविध खेळ घेण्यात आले. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देवेंद्र भारंबे, स्वरा बेलोकर आणि मानव सावळे यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना नेमाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. जोगेश्वरी पाटील यांनी केले. उद्घाटनानंतरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या सूर्यवंशी आणि प्राजक्ता सुरवाडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, कार्यालयीन प्रबंधक भगवान तायडे यांच्यासह मानव्यविद्या शाखेतील प्राध्यापक डॉ. सुभाष झनके, डॉ. एस. टी. धूम, डॉ. अनिल हिवाळे, डॉ. प्रफुल्ल इंगोले, डॉ. एस. के. राठोड, प्रा. सुनील अडकमोल, प्रा. सचिन राजपूत, डॉ. मनोज पाटील, डॉ. राजेंद्र तायडे, प्रा. भूपेंद्र बानाईत, प्रा. कौस्तुभ पाटील, डॉ. दीनानाथ पाठक, प्रा. मनोहर गायकवाड, प्रा. रुपेश धुंडाळे, प्रा. खडके, प्रा. कुणाल तायडे, प्रा. श्रीपाद वाणी, डॉ. जितेंद्र आडेकार, प्रा. कविता पांडव, डॉ. प्रियंका महाजन, डॉ. शलाका निकम, डॉ. किरण समर्थ, प्रा. योगिता भंगाळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता सुरवाडे, रिया रत्नानी, देवांशु बावस्कर, वैभव निकम, अश्विन जाधव आणि देवेंद्र भारंबे यांनी विशेष परिश्रम घेतले. नवागत विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे आणि आनंदाचे स्वरूप प्राप्त झाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version