शिक्षक-पालक सभेत प्रश्नांना व्यासपीठ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह सर्वांगीण विकासावर चर्चा
इंदिरा गांधी व आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त सभेला विक्रमी पालक उपस्थिती; समस्या सोडविण्याचे सी. के. पाटील यांचे आश्वासन
धरणगाव, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षक व पालकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात झालेल्या या सभेला पालकांचा उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सुरेखा पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव तथा आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष सी. के. पाटील, पत्रकार अविनाश बाविस्कर, पंढरीनाथ पाटील, छाया बिऱ्हाडे, गणेश झुंझारराव, सरला पाटील, प्रा. आर. एन. भदाणे तसेच उपप्राचार्य ए. एस. पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांनी शिक्षक-पालक सभेचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांच्यात शिस्त, जबाबदारी आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकांनी विविध प्रश्न व समस्या थेट सभेत मांडल्या. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिस्त, मोबाईलचा वाढता वापर, अभ्यासाचे नियम, शाळेत ये-जा करताना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि प्रवासातील समस्या यांसह विविध विषयांवर पालकांनी मते मांडली. त्यामुळे सभा केवळ औपचारिक न राहता पालकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळाले.
पर्यवेक्षिका भारती पाटील आणि ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घर आणि शाळा यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सचिव तथा आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष सी. के. पाटील यांनी पालकांनी उपस्थित केलेल्या शैक्षणिक, शिस्तीविषयक तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांचे निरसन केले. विद्यार्थ्यांच्या हिताशी निगडित प्रत्येक प्रश्न गांभीर्याने घेण्यात येईल. संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या आणि ठोस उपाययोजना केल्या जातील, तसेच पालकांनी दिलेल्या सूचना विद्यालयाच्या नियोजनात सकारात्मकपणे विचारात घेतल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या सुरेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांना खुले व्यासपीठ मिळाल्याने सभा सकारात्मक आणि विधायक वातावरणात पार पडली. या संवादामुळे शिक्षक-पालकांमधील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुरक्षितता व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती जैन यांनी केले, तर आभार बाबाजी मासूळ यांनी मानले.
