भुसावळ तालुकास्तरीय शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धां उत्साह संपन्न
तब्बल ४४ संघांचा सहभाग; चुरशीच्या लढतींमध्ये खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन
भुसावळ, प्रतिनिधी : सेवा पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, नगरपरिषद भुसावळ आणि म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय मुलींच्या खो-खो व मुलांच्या हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे करण्यात आले. विविध शाळांमधील तब्बल ४४ संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बियाणी अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी शेख परवेज यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संगीता बियाणी, वैभव पवार, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी. एम. पाटील, मुख्याध्यापिका अपर्णा राजपूत, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, विलास पाटील, हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
खो-खोमध्ये सुनसगावच्या संघांची दमदार कामगिरी
मुलींच्या १४ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय, सुनसगाव संघाने विजेतेपद पटकावले, तर महात्मा गांधी विद्यालय संघ उपविजेता ठरला.
१७ वर्षे वयोगटातही दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालयाने विजेतेपद मिळविले. माध्यमिक विद्यालय, ओझरखेडा संघाने उपविजेतेपद पटकावले.
१९ वर्षे वयोगटात गंगाधर सांडू चौधरी विद्यालयाचा संघ विजेता ठरला, तर महात्मा गांधी विद्यालयाचा संघ उपविजेता राहिला.
१९ वर्षे वयोगटातील अन्य सामन्यात महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव संघाने प्रथम क्रमांक मिळविला, तर अलहिरा उर्दू स्कूल, भुसावळ संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
हॉलीबॉलमध्ये महात्मा गांधी विद्यालयाची बाजी
मुलांच्या १४ वर्षे वयोगटातील हॉलीबॉल स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूल संघाने प्रथम क्रमांक मिळविला, तर बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ संघ द्वितीय ठरला.
१७ वर्षे वयोगटात के. नारखेडे विद्यालय संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर पंडित नेहरू विद्यालय, वराडसीम संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
१९ वर्षे वयोगटात महात्मा गांधी विद्यालयाचा संघ विजेता ठरला, तर बियाणी पब्लिक स्कूल संघाने उपविजेतेपद मिळविले.
क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून सांभाळली जबाबदारी
स्पर्धेतील पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील, हिम्मत पाटील, विजय संकट, मुकेश मोरे, उमेश राठोड, नामदेव चव्हाण, निलेश राजपूत, दत्तू अहिरे, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, योगेश खिर्डीकर, गणेश बोदडे, वंदना ठोके आणि अर्चना राजपूत आदी क्रीडा शिक्षकांनी जबाबदारी पार पाडली.
विविध वयोगटातील खेळाडूंनी मैदानावर कौशल्य, चपळाई आणि संघभावनेचे दर्शन घडवत चुरशीच्या लढती दिल्या. प्रत्येक सामन्यात विजयासाठी खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नांमुळे मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली असून, क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी प्रेरणा मिळाली.
