गरताड बारीच्या जंगलात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
हत्या करून मृतदेह जाळल्याचा प्राथमिक संशय; मोहाडी पोलिसांकडून ओळख पटविण्यासह तपास सुरू
धुळे प्रतिनिधी : धुळे तालुक्यातील गरताड बारीच्या जंगल परिसरात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्यात आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
गरताड बारीच्या जंगलात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने मृत महिलेची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. मोहाडी पोलिसांकडून मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमागे नेमके कारण काय, महिलेचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला, तसेच या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळावरून मिळणारे पुरावे आणि तपासातील निष्कर्षांनंतर या घटनेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
