Spread the love

महिलांची भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी भीम आर्मीचे आंदोलन

आरक्षित रिक्त पदांवर तात्काळ भरती करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे : अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) तसेच इतर वर्गातील महिलांना आरक्षणानुसार उपलब्ध असलेल्या पदांवर तात्काळ भरती करून त्यांची भागीदारी सुनिश्चित करावी, या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने धुळ्यात ‘संपूर्ण भागीदारी आंदोलन’ करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

भारतीय संविधानाने नागरिकांना समान संधीचा अधिकार दिला आहे. मात्र शिक्षण, रोजगार, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रासह न्यायव्यवस्था आणि विविध निर्णयप्रक्रियेत महिलांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. विशेषतः एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांना आरक्षणाचा लाभ आणि प्रतिनिधित्व प्रभावीपणे मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आरक्षणाच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी, विविध विभागांमधील रिक्त आरक्षित पदांची तातडीने भरती करावी आणि पात्र महिलांना त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व मिळेल, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली.

महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसोबतच प्रशासकीय, राजकीय आणि निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिकाही आंदोलनकर्त्यांनी मांडली.

यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पॅंथर राहुल वाघ, सागर चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version