जवाहर नगरातील नागरिकांचा नगरपरिषदेवर संताप!
२० वर्षांपासून रस्ता दुर्लक्षित; जुनी पाणी पाइपलाइन व तुंबलेल्या गटारींच्या समस्याही ऐरणीवर
महाराष्ट्र बँक ते कॉटेज हॉस्पिटल रस्ता नव्याने करण्याची मागणी; नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मलकापूर प्रतिनिधी : शहरातील जवाहर नगर परिसरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र बँक ते कॉटेज हॉस्पिटल परिसरातील रस्ता गेल्या सुमारे २० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ता, पिण्याचे पाणी आणि गटारींच्या समस्यांकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी जवाहर नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे दालन गाठून निवेदन सादर केले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र बँक ते कॉटेज हॉस्पिटल हा परिसरातील महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर अनेक दवाखाने व वैद्यकीय सुविधा असल्याने रस्त्यावर नागरिकांची तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र बँक ते कॉटेज हॉस्पिटल हा रस्ता तातडीने नव्याने सिमेंट काँक्रीटचा करावा. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य गटारींची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जुन्या पाणी पाइपलाइनमुळे दूषित पाण्याचा आरोप
जवाहर नगर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची सुमारे तीन इंची जुनी सिमेंट पाइपलाइन खराब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पाइपलाइनमधून दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाणी येत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी असल्याने या समस्येची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
नवीन रस्त्याचे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यात यावी, जेणेकरून भविष्यात वारंवार रस्ता खोदण्याची वेळ येणार नाही, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
तुंबलेल्या गटारींमुळे घरात पाणी शिरण्याची समस्या
महाराष्ट्र बँक ते नारखेडे कॉम्प्लेक्स परिसरातील सर्व्हिस लाईनमधील गटारी तुंबल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाचे पाणी नाल्यांमध्ये साचून काही ठिकाणी घरांमध्ये शिरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून रोगराईचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या गटारी पूर्णपणे नव्याने बांधून त्या रुंद व खोल करण्यात याव्यात, तसेच पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मूलभूत सुविधांसाठी आणखी किती प्रतीक्षा?
रस्ता, शुद्ध पिण्याचे पाणी आणि योग्य जलनिस्सारण व्यवस्था या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र जवाहर नगरातील या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या निवेदनाची नगरपरिषद प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
