Spread the love

धरणगाव तालुक्यात World Vision संस्थेचा वार्षिक मूल्यांकन कार्यक्रम

बाल संरक्षण, शिक्षण, आरोग्य, पोषण व उपजीविकेसह विविध उपक्रमांचा आढावा; आगामी वर्षासाठी कृती आराखड्यावर चर्चा

धरणगाव, प्रतिनिधी : World Vision या सेवाभावी संस्थेच्या वतीने धरणगाव तालुक्यात वार्षिक मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्षभर तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत आगामी काळातील कामाचे नियोजन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात बाल संरक्षण, शिक्षण, आरोग्य व पोषण, सुरक्षित पाणी व स्वच्छता, उपजीविका, बचत गट तसेच समुदाय सहभाग या विषयांवर वर्षभर करण्यात आलेल्या कामाची माहिती घेण्यात आली. विविध उपक्रमांमुळे बालक, महिला आणि कुटुंबांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

वर्षभरातील कामकाजादरम्यान आलेल्या अडचणी, अनुभव, उपलब्धी आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीवर कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी वर्षात समुदायाच्या गरजा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

समुदायाचा सक्रिय सहभाग हा सामाजिक विकासाच्या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बालकांचे संरक्षण, शिक्षण व आरोग्य यासोबतच कुटुंबांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना आगामी काळात अधिक बळ देण्याबाबत चर्चा झाली.

कार्यक्रमास World Vision संस्थेचे अधिकारी जितेंद्र गोरे, राजेश वायदांडेकर, सुशीला वडवी, प्रथम कांबळे, स्वयंसेवक आरती पाटील, वैष्णवी पाटील, जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद शिक्षक कैलास पवार, डॉ. शिंपी, संजय पाटील, प्रतिभा पाटील यांच्यासह गावातील समुदाय प्रतिनिधी, बचत गटातील महिला, बाल संरक्षण समितीचे सदस्य आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

वार्षिक मूल्यांकनाच्या माध्यमातून मागील वर्षातील कामाचे वस्तुनिष्ठ परीक्षण करून आगामी वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे समुदायाच्या सहभागातून बालक आणि कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version