वसंतनगर येथे महावितरणच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप!
निकृष्ट साहित्य व अपुऱ्या खोलीवर विद्युत खांब उभारल्याचा आरोप; वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांमध्ये संताप
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामाच्या पद्धतीवर ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतला असून, कोणतीही पूर्वसूचना न देता काम केले जात असल्याचा तसेच नागरिकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात नवीन केबल टाकण्याच्या कामादरम्यान जुने विद्युत वायर काढण्यात येत आहेत. त्यामुळे गावातील काही भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला असून, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन वीजमीटर घेण्याबाबतही पुरेशी माहिती न देता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गावात येऊन वीजपुरवठा खंडित करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नवीन कनेक्शन मिळेपर्यंत जुनी जोडणी सुरू ठेवण्याची मागणी
गावकऱ्यांनी महावितरणने नागरिकांना सहकार्य करून नवीन वीज जोडणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुने वायर व कनेक्शन बंद करू नये, अशी मागणी केली आहे. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने नवीन कनेक्शनचा खर्च करणे अनेकांना शक्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नवीन कनेक्शनसाठी लागणारी डिमांड नोट व अन्य आवश्यक प्रक्रिया सुलभ करून देण्यात यावी, तसेच तोपर्यंत गावातील कोणत्याही गल्लीतील वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
विद्युत खांबांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, गावात केबल टाकण्यासाठी नवीन विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. हे खांब पुरेशा खोलीपर्यंत जमिनीत गाडण्यात आले नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. काही ठिकाणी खांब साधारण एक ते दीड फूट खोलीपर्यंतच गाडण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी याबाबत संबंधित कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, ज्या ठिकाणी जमीन कडक आहे, तेथे महावितरणच्या निर्देशानुसार एक ते दीड फूट खोदून खांब उभे करण्याच्या सूचना असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, याबाबत संबंधित महावितरण अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
काही खांब वाकलेले असून काही खांबांना आवश्यक ताण दिलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे जोरदार वारा, पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी खांब कोसळण्याची शक्यता असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने कामाची तपासणी करण्याची मागणी
गावातील विद्युत कामे संबंधित सुरक्षा नियम आणि तांत्रिक निकषांनुसार करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नव्याने उभारण्यात आलेले सर्व विद्युत खांब आवश्यक तांत्रिक निकषांनुसार व पुरेशा खोलीपर्यंत गाडण्यात यावेत, तसेच वाकलेले व असुरक्षित खांब तातडीने दुरुस्त अथवा बदलण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गावातील अनेक भागांमध्ये केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जुन्या वायर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, संपूर्ण गावात नवीन मीटर व वीज जोडणीची व्यवस्था होईपर्यंत जुने वायर काढू नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावात कोणतेही विद्युत काम सुरू करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी आणि कामाच्या गुणवत्तेची तसेच सुरक्षिततेची संबंधित विभागाने पाहणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
महावितरणकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण अथवा कामाच्या तांत्रिक निकषांबाबतची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित विभाग ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन विद्युत कामाची पाहणी व आवश्यक कार्यवाही करतो का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
