Spread the love

पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची NQAS अंतर्गत राज्यस्तरीय पाहणी

स्वच्छता, रुग्णाभिमुख सेवा आणि विविध विभागांच्या कामकाजाची बारकाईने तपासणी; राज्य पथकाकडून समाधान व्यक्त

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत भडगाव तालुक्यातील पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची राज्यस्तरीय पाहणी नुकतीच करण्यात आली. राज्यस्तरीय तपासणी पथकाने सकाळी ९ वाजता आरोग्य केंद्राला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली.

राज्यस्तरीय पथकात डॉ. शैलेश पाटील व डॉ. किरण पाटील यांचा समावेश होता. पथकाचे आरोग्य केंद्रात रांगोळी काढून तसेच केंद्रातील गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांनी ‘आशा परसबाग’ ही संकल्पना राबवून स्वागत केले.

यानंतर तपासणी पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. यामध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), प्रसूती कक्ष (लेबर रूम), प्रयोगशाळा, औषध भांडार, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, रुग्णांचे हक्क तसेच विविध नोंदवह्यांची तपासणी करण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आले यश

NQAS अंतर्गत निर्धारित गुणवत्ता मानके पूर्ण करण्यासाठी पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून विशेष परिश्रम घेतले आहेत. आरोग्य केंद्र अधिक स्वच्छ, सुंदर, शिस्तबद्ध आणि रुग्णाभिमुख करण्यावर विशेष भर देण्यात आला.

पाहणीदरम्यान केंद्रातील विविध विभाग, सेवा व्यवस्था आणि नोंदवहींची तपासणी केल्यानंतर राज्यस्तरीय पथकाने आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सर्व गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version