पाटखेडा येथे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य; नागरिकांची ये-जा अडचणीत
रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, नियमित स्वच्छतेची मागणी
जामनेर तालुका प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील पाटखेडा गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्याने नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्यावर परिणाम होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अस्वच्छता पसरल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील रस्त्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
रस्त्यालगत साचलेली घाण, कचरा आणि अस्वच्छतेमुळे पादचारी तसेच वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात
पाटखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने गावातील रस्त्यांची स्वच्छता करून साचलेला कचरा हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच केवळ एकदाच स्वच्छता न करता नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी आणि गावातील रस्ते स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
