Spread the love

स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही तोलवापाडा विकासापासून दूर; ग्रामस्थांनीच श्रमदानातून बनवला रस्ता!

४ किलोमीटर पक्क्या रस्त्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम; मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

धडगाव प्रतिनिधी :
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेल्यानंतरही अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा (तोलवापाडा) येथील ग्रामस्थांना मूलभूत रस्ते सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने निर्माण झालेल्या अडचणींना कंटाळून ग्रामस्थांनी अखेर श्रमदानातून कच्चा रस्ता तयार करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावाला जोडणारा सुमारे ४ किलोमीटरचा रस्ता खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी खड्डे आणि चिखलामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित मार्ग क्रमांक ग्रामा-७९ असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यात या मार्गाची अवस्था अधिक बिकट होत असल्याने गावाचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

शाळकरी मुलांपासून रुग्णांपर्यंत सर्वांचीच गैरसोय

रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, रुग्ण, गरोदर महिला आणि शेतकरी यांना बसत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. लहान मुलांना अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही वेळा रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येते, अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. पावसाळ्यात रस्ता वाहतुकीस अयोग्य झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनाही शेतीमालाची वाहतूक करताना खराब रस्त्यामुळे आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

‘शासनाच्या योजना कागदावरच?’

गावाच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात रस्त्याचा प्रश्न कायम राहतो, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी स्वतः श्रमदानाचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने आता या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

४ किलोमीटर पक्का रस्ता आणि पुलाची मागणी

पिंपळखुंटा-तोलवापाडा येथे सुमारे ४ किलोमीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पुलांची उभारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मागणी मान्य करून बारमाही वाहतुकीसाठी पक्का रस्ता उपलब्ध करून न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी रोता हिमडा वसावे, विजय मोहना वसावे, नारसिंग मोहना वसावे, निमजी दामजा वसावे, गिम्ब्या ठोबड्या वसावे, धनजी हिमडा वसावे, मंगल वाहऱ्या वसावे, दशरथ कालशा वसावे, खुमानसिंग रोता वसावे, कालूसिंग दामजा वसावे, रमेश वसावे, कागडा रोता वसावे, खेमजी वसावे, दामज्या वळवी, वन्या वसावे, किसन वसावे, दिलीप वसावे, पिसा वसावे, ईश्वर वसावे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

‘श्रमदानातून रस्ता बनवण्याची वेळ आली’

रमेश वसावे, जागृत युवक, तोलवापाडा :
“पक्का रस्ता नसल्याने सुमारे ४५० ते ७०० ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ येते. वेळेवर उपचारासाठी पोहोचता न आल्याने गंभीर प्रसंग उद्भवल्याचेही ग्रामस्थ सांगतात. पावसाळ्यात रस्ता बंद झाल्याने मुलांच्या शाळेवरही परिणाम होतो. वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर श्रमदानातून रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने तातडीने गावाला वर्षभर वापरता येईल असा पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा.”

आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही कधी सुरू करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version