पारोळा तालुक्यातील ४ ‘कोतवाल’ पदांसाठी आरक्षण जाहीर!
तहसील कार्यालयात चिठ्ठीद्वारे महिला आरक्षण सोडत; १ ओबीसी महिला व १ सर्वसाधारण महिला पद निश्चित
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील विविध महसूल सजांमध्ये रिक्त असलेल्या महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील चार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या बिंदूनामावलीनुसार या पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पारोळा तहसील कार्यालयात चिठ्ठीद्वारे महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.
एरंडोल महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी आरक्षण सोडतीची माहिती दिली. महसूल विभागाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून पारोळा तालुक्यातील कोतवाल संवर्गाची बिंदूनामावली मंजूर करण्यात आली आहे.
चारही पदे सरळसेवेने भरणार
मंजूर बिंदूनामावलीनुसार पारोळा तालुक्यातील रिक्त असलेली चारही पदे १०० टक्के सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार आरक्षण सोडतीत १ ओबीसी सर्वसाधारण, १ सर्वसाधारण आणि महिलांसाठी २ पदे निश्चित करण्यात आली. महिलांच्या ३० टक्के आरक्षणानुसार चिठ्ठीद्वारे १ ओबीसी महिला आणि १ सर्वसाधारण महिला अशी दोन पदे निश्चित करण्यात आली आहेत.
महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसील कार्यालयात शासकीय पद्धतीने चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रिया पार पडली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आरक्षणाची माहिती जाहीर केली.
या महसूल सजांचा समावेश
कोतवाल पदांच्या भरती प्रक्रियेत पुढील चार महसूल सजांचा समावेश आहे :
१. पारोळा सजा : पारोळा शहर
२. शेवगे बु. सजा : बोदर्डे, शेवगे बु., पुनगाव
३. टोळी सजा : टोळी, मोंढाळे प्र. उ., पिंप्री प्र. उ.
४. सावखेडे मराठ सजा : सावखेडे होळ, सावखेडे मराठ, सावखेडे तुर्क, कन्हेरे
या चारही सजांमधील कोतवाल पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया शासकीय नियमानुसार चिठ्ठ्या टाकून पार पाडण्यात आली.
यावेळी तहसीलदार उल्हास देवरे, नायब तहसीलदार अनिल पाटील, संबंधित आस्थापना विभागाचे कर्मचारी तसेच दगडू पवार सर, सुरेश पाटोळे, योगेश राजपूत, प्रविण पाटील यांच्यासह संबंधित महसूल सजांमधील नागरिक उपस्थित होते.
