महार रेजिमेंटचा स्थापना दिवस उत्साहात संपन्न
अतुल्य शौर्य गाजविणाऱ्या १५ माजी सैनिकांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान; सैनिक सन्मान रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे प्रतिनिधी :
महार रेजिमेंटचा स्थापना दिवस यशसिद्धी माजी सैनिक सेवा संघाच्या वतीने सैनिक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्थापना दिनाचे औचित्य साधून देशसेवेत अतुल्य शौर्य आणि पराक्रम गाजविणाऱ्या १५ माजी सैनिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास, शौर्यगाथा आणि देशसेवेतील योगदानाची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन सैनिक सन्मान रॅलीला सुरुवात करण्यात आली. आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर आग्रा रोड, कराचीवाला खुंट, जुनी महानगरपालिका, झाशी राणी चौक, नवीन महानगरपालिका मार्गे रॅली सैनिक भवन येथे पोहोचली.
सैनिक भवन येथे महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध वक्त्यांनी महार रेजिमेंटच्या इतिहासावर प्रकाश टाकत रेजिमेंटने देशाच्या संरक्षणासाठी बजावलेल्या भूमिकेची आणि जवानांनी गाजविलेल्या शौर्याची माहिती दिली.
यानंतर देशसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ माजी सैनिकांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महापुरुषांच्या जयघोषासह ‘महार रेजिमेंटचा विजय असो’ अशा घोषणांनी सैनिक भवन परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास एनसीसी बटालियनचे कमान अधिकारी संजय कुमार, कर्नल रणधीर सतीश कुमार देवराम, निलेश प्रकाश पाटील, समाज कल्याण अधिकारी संजय सैंदाणे, गौतम शीलावंत, प्रमुख वक्ते ॲड. राहुल वाघ, जयवंत नेमाने, भीमराव बोरसे, रोहिदास बैसाणे, रामचंद्र जाधव यांच्यासह माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शौर्यगाथेला उजाळा
महार रेजिमेंटच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच नव्या पिढीसमोर रेजिमेंटची शौर्यपरंपरा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
