जनजागृतीपलीकडे एक पाऊल; टाकरखेड्यात नागरिकांच्या मोबाईल सुरक्षेवर प्रत्यक्ष काम
‘सायबर शिक्षित गाव’ उपक्रमातून घराघरात डिजिटल सुरक्षेचा आढावा; मोबाईलमधील सुरक्षा सेटिंग्ज सक्षम करण्यासाठी प्रत्यक्ष मदत
जळगाव प्रतिनिधी :
सायबर सुरक्षेबाबत केवळ जनजागृती न करता नागरिकांच्या प्रत्यक्ष डिजिटल वापराचा आढावा घेऊन आवश्यक सुरक्षा उपाय करण्याच्या उद्देशाने टाकरखेडा येथे ‘सायबर शिक्षित गाव’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून नागरिकांच्या मोबाईल वापरातील संभाव्य जोखीम ओळखून त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात आल्या.
Quick Heal Foundation, Pune आणि QHF Cyber Warriors Club, KBCNMU, Jalgaon यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. नागरिकांना सायबर गुन्हे, डिजिटल सुरक्षा, सुरक्षित मोबाईल वापर तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
घराघरात जाऊन घेतला डिजिटल सुरक्षेचा आढावा
उपक्रमाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत करण्यात आली. १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पहिली भेट घेण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांचे Pre-Survey करण्यात आले.
स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन नागरिक मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात, कोणत्या सुरक्षा सुविधा वापरतात, मोबाईलमध्ये कोणत्या गोपनीयता व सुरक्षा सेटिंग्ज सक्रिय आहेत तसेच डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याची माहिती घेतली.
मोबाईलमधील डेटा सुरक्षेची प्रत्यक्ष तपासणी
यानंतर २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत दुसरी भेट घेण्यात आली. या वेळी ‘Phone Data Leakage Camp’ आयोजित करण्यात आला.
या शिबिरादरम्यान नागरिकांच्या मोबाईलची तपासणी करून अनावश्यकपणे डेटा शेअर होण्याची शक्यता, गोपनीयतेशी संबंधित संभाव्य जोखीम आणि विविध सुरक्षा बाबींचा आढावा घेण्यात आला. आवश्यक सुरक्षा सेटिंग्ज सक्षम करून नागरिकांच्या मोबाईलची सुरक्षितता वाढविण्यासाठी स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष मदत केली.
२० ‘Cyber Warriors’चा सहभाग
या उपक्रमात २० Cyber Warriors तसेच School of Computer Science मधील इच्छुक स्वयंसेवक सहभागी झाले. शिक्षक समन्वयक राजू आमले आणि टाकरखेडा गावचे सरपंच प्रवीण पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
घराघरात जाऊन नागरिकांच्या डिजिटल वापराची माहिती घेणे, त्यानंतर मोबाईलमधील सुरक्षा व गोपनीयतेशी संबंधित बाबींची तपासणी करणे आणि आवश्यक सुरक्षा सेटिंग्ज सक्षम करून देणे, अशा दोन टप्प्यांतून ‘सायबर शिक्षित गाव’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
या उपक्रमामुळे सायबर सुरक्षेची माहिती देण्याबरोबरच नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या मोबाईल सुरक्षेबाबत प्रत्यक्ष कृती करण्यास मदत झाली.
