एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार! साकतमध्ये नादुरुस्त बसला ग्रामस्थांनी मारला धक्का
पाटोदा–साकत–जामखेड मार्गावरील बससेवेचा प्रश्न ऐरणीवर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व रुग्णांचे हाल
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड : जामखेड तालुक्यातील साकत येथे भररस्त्यात एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांसह ग्रामस्थांना बसला धक्का मारून ती सुरू करण्याची वेळ आल्याचा प्रकार समोर आला आहे. नादुरुस्त बस वारंवार मार्गावर धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
साकत परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. बस बंद पडल्यावर प्रवाशांनीच ‘दे धक्का’ देत ती सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागत असल्याने एसटी प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. जामखेड आगाराकडून साकत मार्गावर नियमित आणि सुस्थितीतील बस उपलब्ध करून दिली जाणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान?
दरम्यान, पाटोदा–साकत–जामखेड या मार्गावरील बससेवेचा प्रश्नही गंभीर बनल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाटोदा आगाराकडून या मार्गावरील बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बससेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
‘हेलपाटा’ बस सुरू करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर जामखेड–साकत–पाटोदा या मार्गावर विशेष ‘हेलपाटा’ अर्थात फेरी बस तातडीने सुरू करावी, अशी मागणी साकत व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मार्गावर नादुरुस्त बस पाठविण्याऐवजी सुस्थितीतील बस उपलब्ध करून देऊन प्रवाशांना नियमित आणि सुरक्षित सेवा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
एसटी प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन बससेवा सुरळीत करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, बस बंद पडण्याचे नेमके कारण आणि पाटोदा–साकत–जामखेड मार्गावरील सेवा बंद करण्याबाबत एसटी प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
