सौ. रजनीताई देशमुख महाविद्यालयात स्पोकन इंग्लिश कार्यशाळा
इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी सातत्यपूर्ण सराव व आत्मविश्वास आवश्यक; तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘स्पोकन इंग्लिश’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबत आत्मविश्वास निर्माण करणे, संभाषण कौशल्य विकसित करणे तसेच रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून किसान महाविद्यालय, पारोळा येथील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रमोद चौधरी तसेच एस. व्ही. के. एम. संस्थेचे एन. एम. आय. एम. एस. ग्लोबल युनिव्हर्सिटी, धुळे येथील सहाय्यक प्राध्यापक प्रा. निलेश बाविस्कर उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रमोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी सातत्याने सराव करण्याचे आवाहन केले. इंग्रजी बोलताना मनातील भीती व संकोच दूर करून आत्मविश्वासाने संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. निलेश बाविस्कर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत इंग्रजी व्याकरणातील विविध बारकावे समजावून सांगितले. इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व तसेच विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी भाषेचे ज्ञान केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष संभाषणातून ते विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एस. भालेराव, डॉ. जनार्दन देवरे, डॉ. बी. एच. पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.
