Spread the love

आई आजारी, वडिलांचे छत्र हरपले; विशालने जिद्दीने गाठले लंडन

गडचिरोलीतील छोट्या गावातून फर्ग्युसन महाविद्यालय, अझीम प्रेमजी विद्यापीठ ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स; आदिवासी विकास विभागाची ८० लाख २० हजारांची शिष्यवृत्ती

भुसावळ : संघरत्न सपकाळे

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या जोरावर पुढे जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारा आहे. याच विचारांना कृतीत उतरवत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लखमापूर-बोरी येथील विशाल मेश्राम याने आपल्या जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय शैक्षणिक झेप घेतली आहे. छोट्याशा गावातून सुरू झालेला त्याचा शिक्षणप्रवास आता थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत पोहोचला आहे.

विशाल मेश्राम याची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सार्वजनिक धोरण (Public Policy) विषयातील पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या परदेशातील शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून ८० लाख २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विशालच्या या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची साथ सोडली नाही

विशालचा शैक्षणिक प्रवास मात्र तितकाच संघर्षमय आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाच त्याच्या आईला विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही काळापूर्वी वडिलांचे निधन झाल्याने विशालच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्रही हरपले. अशा कठीण परिस्थितीत त्याचा सांभाळ आजोबांनी केला.

कौटुंबिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीसमोर खचून न जाता विशालने शिक्षणालाच आपली ताकद बनवले. परिस्थिती बदलण्याचे साधन म्हणून त्याने शिक्षणाकडे पाहिले आणि प्रत्येक टप्प्यावर मेहनत घेत पुढची वाटचाल सुरू ठेवली.

चामोर्शीपासून पुणे, बंगळुरू आणि आता लंडन

विशालने चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. पुढे त्याने बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठातून विकास व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या टप्प्यावरही त्याला शिष्यवृत्तीचा आधार मिळाला.

शैक्षणिक क्षेत्रातील ही वाटचाल पुढे नेत आता विशालने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सार्वजनिक धोरणाच्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवला आहे.

वंचितांसाठी काम करण्याची दिशा

सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करून भविष्यात समाजातील वंचित, ग्रामीण आणि गरजू नागरिकांसाठी काम करण्याची दिशा विशालने निवडली आहे. त्यामुळे त्याचे हे यश केवळ वैयक्तिक शैक्षणिक कामगिरी न राहता, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लखमापूर-बोरीसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला विशालचा प्रवास अनेक अडथळे पार करत लंडनपर्यंत पोहोचला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची साथ असेल तर मोठी स्वप्नेही गाठता येतात, हा संदेश त्याच्या प्रवासातून अधोरेखित होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version