खेळातून खिलाडूवृत्ती, शिस्त व संघभावना निर्माण होते : सी.के. पाटील
इंदिरा गांधी विद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
धरणगाव प्रतिनिधी :
धरणगाव शहरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटातील या स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे सचिव तथा शिक्षक संघटनेचे नेते सी.के. पाटील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास प्राचार्या सुरेखा पाटील, संस्थेचे संचालक आशिषकुमार पाटील, उपमुख्याध्यापक ए.एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इंदिरा गांधी विद्यालय व तालुका क्रीडा समन्वय समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
‘खेळातून शिस्त आणि संघभावना वाढते’
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना सी.के. पाटील म्हणाले, “खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. व्हॉलीबॉल हा सुंदर सांघिक खेळ असून, त्यातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढतो.” सहभागी सर्व खेळाडूंना त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची रूपरेषा व आयोजनाची माहिती दिली.
क्रीडा शिक्षक व पंचांची उपस्थिती
यावेळी क्रीडा शिक्षक डी.एन. पाटील, ललित ढोके, प्रा. जितेंद्र ओस्तवाल, एस.पी. सोनार, पी.डी. पाटील, चेतन पाटील, ज्ञानेश्वर घुले, कौशल पाटील, आशिष पाटील, फिलिप्स गावित तसेच पंच क्षितिज सोनवणे, सागर मोरे, निलेश पाटील, आकाश बिवाल, विनय पाटील यांच्यासह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक आणि खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी. पाटील यांनी केले. तालुकास्तरीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उपस्थित क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक आणि आयोजकांनी सहकार्य केले.
