धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये ‘बापूंच्या विचारांची शाळा’; सत्यपेटीने जिंकली मनं
गांधी जयंतीनिमित्त सर्वधर्म प्रार्थना, ११ व्रतांचा जागर आणि विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद; शालेय परिसरात स्वच्छता अभियान
धरणगाव प्रतिनिधी :
नेहमीची शाळेची घंटा, वर्गातील फळा आणि शिकवणीचा पारंपरिक ढाचा… याला काही काळ बाजूला ठेवत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा जागर घडवून आणणारा आगळावेगळा उपक्रम धरणगाव येथील पी.आर. हायस्कूलमध्ये राबविण्यात आला. गांधी-शास्त्री जयंती केवळ औपचारिक पद्धतीने साजरी न करता विद्यार्थ्यांना गांधी विचारांचा अनुभव देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक डॉ. बापू शिरसाठ यांच्या संकल्पनेतून आणि पर्यवेक्षक ज्ञानेश्वर कोळी यांच्या पुढाकाराने शाळेचे वातावरणच बदलून गेले होते. वर्गांच्या भिंतींवर नेहमीचे शैक्षणिक धडे न दिसता महात्मा गांधींची ११ व्रते विद्यार्थ्यांना वाचता यावीत, यासाठी ती ठळकपणे प्रदर्शित करण्यात आली होती.
‘वैष्णव जन तो’च्या सुरांनी शाळेची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेऐवजी सर्वधर्म प्रार्थनेने करण्यात आली. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ आणि ‘रघुपती राघव राजाराम’ या प्रार्थनांच्या सुरांनी संपूर्ण शाळेचे वातावरण भारावून गेले.
‘घाबरू नका, सत्य लिहा!’ — सत्यपेटीचा अभिनव उपक्रम
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्यात आलेली ‘सत्यपेटी’. या पेटीवरच ‘घाबरू नका, सत्य लिहा’ असा संदेश देण्यात आला आहे.
मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना मनातील सत्य निर्भयपणे मांडता यावे, शाळा, शिक्षक किंवा शैक्षणिक व्यवस्थेबाबत त्यांना जे वाटते ते त्यांनी निनावी पद्धतीने सांगावे, यासाठी ही पेटी आहे. दर शनिवारी या पेटीत आलेल्या चिठ्ठ्यांवर चर्चा केली जाईल.”
विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न, सूचना आणि भावना जाणून घेण्यासाठी हा उपक्रम संवादाचे माध्यम ठरणार आहे.
‘वर्ग नाही, संवाद’ — गांधी विचारांची अनुभूती
कार्यक्रमादरम्यान पारंपरिक वर्गरचनेऐवजी विद्यार्थी गोलाकार बसून शिक्षकांशी मुक्तपणे संवाद साधत होते. शिक्षकांनी केवळ धडे न शिकवता विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न उपस्थित केले.
‘आज गांधीजी असते तर त्यांनी मोबाईलचा वापर कसा केला असता?’ आणि ‘प्लास्टिकच्या कचऱ्यावर बापूंनी काय उपाय सुचविला असता?’ अशा विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध कल्पना आणि प्रश्नांमुळे संवाद अधिक रंजक झाला.
स्वच्छतेतून गांधी विचारांचा प्रत्यक्ष अनुभव
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता ही केवळ उपक्रमाची बाब नसून दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी, हा संदेश या कृतीतून देण्यात आला.
या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. वैशाली गालापुरे, प्रदीप असोदेकर, गणेश सूर्यवंशी, सुरेंद्र सोनार, नंदू पाटील, संजय बेलदार, नीरज शिंदे, रविंद्र पाटील, गोपाल चौधरी, गोपाल सोनवणे, प्रवीण पाटील, राजेश ठाकरे, प्रशांत महाजन यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
गांधी-शास्त्री जयंतीच्या निमित्ताने सत्य, निर्भय संवाद, स्वच्छता आणि विचारस्वातंत्र्य यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देणारा हा उपक्रम पी.आर. हायस्कूलच्या उपक्रमशीलतेची वेगळी ओळख ठरला.
