एम. एम. महाविद्यालयाच्या प्रा. जयश्रीताई वाघ यांनी साकारले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सुंदर रांगोळीचित्र
महाकुंभ रोजगार मेळाव्यात कलात्मक आविष्कार; रांगोळीचित्राने वेधले उपस्थितांचे लक्ष
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
पाचोरा : श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे आयोजित महाकुंभ रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एम. एम. महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वाघ यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सुंदर व देखणे रांगोळीचित्र साकारले.
रांगोळीच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे व्यक्तिमत्त्व साकारताना प्रा. जयश्रीताई वाघ यांनी आपल्या कलात्मक प्रतिभेचा आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा सुरेख आविष्कार घडवून आणला. त्यांच्या हातून साकारलेल्या या रांगोळीचित्राने रोजगार मेळाव्यास उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांनी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक करत उत्स्फूर्तपणे दाद दिली.
कलेसोबत अध्यापनाचीही प्रभावी वाटचाल
कला हा प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असून त्या Fine Arts मध्ये टॉपर राहिल्या आहेत. शिक्षण, कला, सामाजिक कार्य आणि विविध गुणांनी समृद्ध असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या कलागुणांची सातत्याने जोपासना केली असून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
त्यांनी साकारलेल्या या रांगोळीचित्रातून कलात्मक जाण, कल्पकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. महाकुंभ रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने साकारण्यात आलेले हे रांगोळीचित्र उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.
