वाघूर धरणातून रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याची मागणी
सिंचन लाभधारक समितीचे ना. गुलाबराव पाटील व ना. गिरीष महाजन यांना निवेदन; ७३ टक्के पाणीसाठ्याचा रब्बीसाठी वापर करण्याची मागणी
पाळधी : वाघूर धरण सिंचन लाभधारक समितीच्या सदस्यांनी आज पाळधी येथे राज्याचे मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांची भेट घेऊन वाघूर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रब्बी पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने सोडण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन ना. गिरीषभाऊ महाजन यांनाही देण्यात आले.
यंदा राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे समितीने निवेदनातून नमूद केले आहे.
जळगाव, जामनेर आणि भुसावळ तालुक्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या वाघूर धरणात सध्या ७३ टक्के जिवंत पाणीसाठा असल्याचे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यातून लाभक्षेत्रातील डावा व उजवा कालवा यांना रब्बी पिकांसाठी दोन आवर्तने सोडल्यास धरणातील जिवंत पाणीसाठ्यापैकी केवळ सुमारे ३ ते ४ टक्के पाण्याचा वापर होईल, असा दावा समितीने केला आहे.
रब्बी पिकांसाठी दोन आवर्तने उपलब्ध झाल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिके घेणे सुलभ होईल. तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यासही मदत होईल, त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील चारा टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास हातभार लागेल, असे समितीने निवेदनात म्हटले आहे.
वाघूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, अशी विनंती सिंचन लाभधारक समितीच्या वतीने दोन्ही मंत्र्यांकडे करण्यात आली.
यावेळी सिंचन लाभधारक समितीचे सदस्य लालचंद पाटील, तुषार महाजन, किशोर चौधरी, मिलिंद चौधरी, राजेंद्र चौधरी, धनराज राणे, अरुण पाटील तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
