Spread the love

‘एक पाऊल पर्यावरणासाठी, एक संधी कलागुणांसाठी’; धुळे गरबा महोत्सव 2.0 मध्ये महाराष्ट्र-गुजरातच्या गरब्यांचा संगम

धुळे : नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देण्याचा उपक्रम नगरसेवक ललित माळी यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छाऐवजी वृक्ष देऊन करण्यात येणार असल्याची माहिती मोटिवेशनल ट्रेनर प्रियंका माने यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

स्त्रीशक्तीचा जागर करतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरसेवक ललित माळी यांच्या माध्यमातून प्रभागातील महिलांसाठी भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, तर एक संधी तुमच्या कलागुणांसाठी’ या संकल्पनेतून नगरसेवक ललित माळी आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘धुळे गरबा महोत्सव 2.0’ आयोजित करण्यात आला आहे.

गरबा प्रशिक्षणाला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात
नागावबारी येथील केशरानंद मंगल कार्यालयात ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत गरबा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सायंकाळी ७ वाजल्यापासून जीटीपी स्टॉपसमोरील महर्षी व्यास नगर येथे गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यंदाच्या गरबा महोत्सवात महाराष्ट्र आणि गुजरातमधील गरबा संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा आणि नवरात्रोत्सव आनंदोत्साहात साजरा करता यावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात धुळे शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक ललित माळी आणि मोटिवेशनल ट्रेनर प्रियंका माने यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version