Spread the love

ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह विविध मंत्री व मान्यवरांची उपस्थिती; टॉपलाइन रिसॉर्टमध्ये अमृतमहोत्सवी सोहळा

धुळे, ता. ४ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल (ओपी शेट) यांच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उद्या, सोमवार (ता. ५) अभीष्टचिंतन व सन्मानपत्र प्रदानाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील टॉपलाइन रिसॉर्ट येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ओमप्रकाश अग्रवाल अमृतमहोत्सव समिती आणि शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ४ व ५ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त रविवारी गोपूजन, दुष्काळग्रस्त ११ शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी ११ गायींचे दान तसेच अग्रवाल कुटुंबीयांतर्फे दुष्काळ निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याच दिवशी प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी आणि साधो बँड यांच्या भक्तिमय गीतगायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

आज तावडेंसह विविध नेत्यांची उपस्थिती

सोमवारी सायंकाळी साडेसहाला टॉपलाइन रिसॉर्ट येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अभीष्टचिंतनासह अमृतमहोत्सव समितीतर्फे सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार विनोद तावडे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, सार्वजनिक आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे असतील प्रमुख मान्यवर

या कार्यक्रमास आमदार अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशिराम पावरा, मंजुळा गावित, अनिल पाटील, राहुल ढिकले, राम भदाणे, राजूमामा भोळे, अमोल जावळे, राजेश पाडवी, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे, चंद्रकांत रघुवंशी, सीमा हिरे, तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, कुणाल पाटील, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

ओमप्रकाश अग्रवाल हे विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या काळातील आजी-माजी विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या वेळी त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version