ज्यूडोच्या आखाड्यात कृष्णा महाजनची विजयी झेप; विभागात अव्वल, राज्यस्तरावर धडक
८० किलो वजनी गटात विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय शालेय ज्यूडोसाठी निवड
धरणगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित विभागीय शालेय ज्यूडो क्रीडा स्पर्धेत इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगावचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने दमदार कामगिरी करत विभागस्तरावर अव्वल स्थान पटकावले.
कृष्णाने १९ वर्षांखालील ८० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. नाशिक येथील यशवंत व्यायामशाळा, एम.जी. रोड येथे झालेल्या या स्पर्धेत कृष्णाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे कृष्णा महाजनची राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्तरावरील यशानंतर आता राज्यस्तरावरही दमदार कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
कृष्णाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक डी. एन. पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. नियमित सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे कृष्णाने ही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगण्यात आले.
कृष्णाच्या यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील, उपमुख्याध्यापक ए. एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृष्णा महाजन आणि प्रशिक्षक डी. एन. पाटील यांचे अभिनंदन केले.
कृष्णाच्या या यशामुळे इंदिरा गांधी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कृष्णाला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
