Spread the love

दुष्काळाच्या झळा अन् दिवाळीची चिंता; कासविहिरीत शेतकऱ्यांची व्यथा, बावनकुळेंकडून मदतीचा शब्द

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी; दिवाळीपूर्वी शक्य तितकी मदत मिळवून देण्याचे आश्वासन

धुळे, प्रतिनिधी : पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळे तालुक्यातील कासविहीर परिसरातील दुष्काळग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींची व्यथा मांडत दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली.

दुष्काळामुळे पिके हातातून गेली असून उत्पादनाची अपेक्षा मावळली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह, शेतीवरील खर्च आणि कर्जाचा भार यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कासविहीर परिसरातील पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी थेट महसूलमंत्र्यांसमोर मांडल्या.

शेतकऱ्यांची व्यथा ऐकून बावनकुळे यांनी दिवाळीपूर्वी शक्य तितकी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पीक नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीबाबत निर्णय घेतला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

बँका, पतसंस्था आणि सावकारांना इशारा

दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांवर कर्जवसुलीचा तगादा लावू नये, अशा सूचना प्रशासनामार्फत बँका आणि संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, अशी भूमिका बावनकुळे यांनी यापूर्वीही स्पष्ट केली आहे.

त्याचबरोबर अनधिकृत सावकारी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचनाम्यांवर मदतीचा निर्णय

दुष्काळग्रस्त भागात सध्या पीक नुकसानीचे पंचनामे आणि परिस्थितीचे मूल्यांकन सुरू आहे. शासनाकडून एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच पीक विमा योजनेच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

कासविहीर परिसरातील शेतकऱ्यांसाठी मात्र आता प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा आहे. दुष्काळाने खरीप हंगाम उद्ध्वस्त केला असताना दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे शासनाच्या आश्वासनानंतर मदत नेमकी कधी आणि किती मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version