ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी ‘भीष्म पितामह’
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गौरवोद्गार; अमृतमहोत्सवानिमित्त ११ शेतकऱ्यांना दुभत्या गायींचे गोदान, दुष्काळ निधीसाठी ११ लाखांचा धनादेश देण्याची घोषणा
धुळे, दि. ५ (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अग्रवाल कुटुंबाने दुष्काळी परिस्थितीचे समाजभान राखत शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता जपली. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ११ शेतकऱ्यांना वासरांसह दुभत्या गायींचे गोदान करण्यात आले, तर शासनाच्या दुष्काळ निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश देण्याची घोषणाही करण्यात आली.
ओमप्रकाश अग्रवाल हे धुळे शहराच्या सामाजिक, राजकीय, सहकार, आध्यात्मिक आणि उद्योग क्षेत्रातील ‘भीष्म पितामह’ आहेत. संघर्षातून उभा राहिलेला त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून, राष्ट्रवादाची प्रेरणा घेत जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षातील विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचली. समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, असे गौरवोद्गार राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. ४) खान्देश गोशाळेच्या मैदानावर ओपी शेट यांचा सन्मान, भजनसंध्या, भक्तिमय गीतगायन आणि शेतकऱ्यांना गोदान असा विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बावनकुळे बोलत होते.
यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सत्कारमूर्ती ओमप्रकाश अग्रवाल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह विविध आमदार, लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
सरकार अनुपभैयांच्या पाठीशी : बावनकुळे
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, धुळे शहरवासीयांनी अनुपभैया अग्रवाल यांच्या रूपाने विधानसभेत एक ‘हिरा’ कार्यकर्ता पाठविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारांमध्ये अनुपभैयांचा समावेश आहे. धुळे शहरातील प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
अनुपभैयांनी विधानसभा निवडणुकीत धुळेकरांना दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही देत शहर विकासासाठी त्यांनी मागितलेले प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी सरकार सहकार्य करेल, असे बावनकुळे यांनी जाहीर केले.
ओपीजींची संघर्षातून वाटचाल : रावल
पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, ‘आई-वडिलांमध्येच देव असतो’ या भावनेतून आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी आपल्या वडिलांचा अमृतमहोत्सव सोहळा भव्य स्वरूपात आयोजित केला आहे. ओपी शेट यांनी अत्यंत कष्ट आणि संघर्षातून जीवनाची वाटचाल केली.
जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. विविध आंदोलनांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या संस्कारातून घडलेले अनुपभैया आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून वडिलांच्या अमृतमहोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणे ही अभिमानाची बाब असल्याचे रावल यांनी सांगितले.
ओपीजी हे द्रष्टे व्यक्तिमत्त्व : महाजन
जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ओपी शेट यांचा अमृतमहोत्सवी सोहळा हा त्यांच्या ७५ वर्षांच्या संघर्षाचा, संस्कारांचा आणि समाजसेवेचा गौरव आहे. ‘जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए’ याची प्रचिती ओपी शेट यांच्या जीवनप्रवासातून येते.
किती वर्षे जगलो यापेक्षा समाजासाठी कसे जगलो, गोरगरीब आणि गरजूंसाठी काय योगदान दिले, धर्म आणि राष्ट्रासाठी काय कार्य केले, हे महत्त्वाचे आहे. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील ओपी शेट यांचे योगदान आजही मार्गदर्शक आहे.
राजकारण, समाजकारण, उद्योग, शिक्षण, सहकार आणि अर्थकारण अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्यांनी सामान्य जनतेशी नाते जोडले. अनुपभैयांच्या रूपाने त्यांच्या कुटुंबातून धुळे शहराला चांगला लोकप्रतिनिधी मिळाला असून, ३०० सदस्यांचा परिवार आजही एकसंध ठेवण्याचे श्रेय ओपी शेट यांना जाते, असे महाजन यांनी सांगितले.
रावेर एमआयडीसीसाठी २ हजार एकर जागा मंजूर : अनुपभैया
आमदार अनुपभैया अग्रवाल म्हणाले की, ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळेकरांना मोठी भेट दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेले एमआयडीसी विस्तारीकरणाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. रावेर एमआयडीसीसाठी २ हजार एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे अनुपभैयांनी आभार मानले.
आमदार अनुपभैया आम्हा सर्वांचे लाडके आमदार : बावनकुळे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अनुपभैया अग्रवाल हे आम्हा सर्वांचे लाडके आमदार आहेत. धुळे शहराच्या विकासासाठी त्यांनी सुचविलेल्या प्रत्येक कामाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा पाठविल्या आहेत. अनुपभैयांच्या नेतृत्वात धुळे शहराला अधिक शक्तिशाली आणि विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. धुळे शहराच्या विकासासाठी ४० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला असून, त्यासाठी आमदार अनुपभैया अग्रवाल आणि महापौर मायादेवी परदेशी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे.
