राणी दुर्गावती जयंतीनिमित्त धुळ्यात आदिवासी महिलांचा बचत गट मेळावा
सेवा संकल्प अभियानांतर्गत १०० बचत गटांना १० लाखांचा निधी; ७४ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव
धुळे | प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथे आदिवासी महिलांच्या बचत गटाचा मेळावा, विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप तसेच गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर आयोजित या उपक्रमाला आदिवासी महिला, विद्यार्थी, अधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी आयोजित बचत गट मेळाव्यात १०० आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. या निधीमुळे महिला बचत गटांच्या आर्थिक उपक्रमांना बळ मिळणार आहे.
३० लाभार्थ्यांना ३५ लाखांचे योजनालाभ
न्यूक्लियस बजेट अंतर्गत विविध योजनांमधून पात्र ठरलेल्या ३० लाभार्थ्यांना सुमारे ३५ लाख रुपयांच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात आले. याशिवाय शासनाच्या विविध योजना, त्यांची पात्रता व उपलब्ध लाभ याबाबत लाभार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी कार्यक्रमस्थळी माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते.
७४ गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा गौरव
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा राघोजी भांगरे गुणगौरव प्रोत्साहनपर बक्षीस योजनेअंतर्गत विशेष गुणगौरव करण्यात आला.
दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ७४ विद्यार्थ्यांना एकूण १२ लाख ७८ हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
सूक्ष्म नियोजनातून उपक्रमाला यश
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनातून सेवा संकल्प अभियानांतर्गत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यात आल्याचे यावेळी दिसून आले.
पात्र लाभार्थी महिला व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सेवा संकल्प अभियानातील विविध उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन सोनुने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पात्र लाभार्थी महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
