Spread the love

सुजात आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्डवर कारवाईची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे फर्दापूर पोलीस ठाण्यात निवेदन; चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासह सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

सावळदबारा / फर्दापूर (प्रतिनिधी मनोहर जगताप) : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर कथितरीत्या आक्षेपार्ह व अश्लील भाषेत बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबल व एका होमगार्ड जवानाविरोधात कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात फर्दापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सचिन भाऊ शिंदे (पूर्व तालुकाध्यक्ष), बनेखाँ पठाण (ता. अध्यक्ष, सिल्लोड) आणि मनोहर जगताप (ता. निरीक्षक) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सोशल मीडिया पोस्टचा आरोप

निवेदनात नमूद केल्यानुसार, ३ ऑक्टोबर  २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंग मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर उपस्थित होते. यावेळी एका विद्यार्थ्याने औरंगाबाद नामांतरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबल आणि एका होमगार्ड जवानाने सोशल मीडियावर सुजात आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषेतील पोस्ट केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित पोस्टचा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून निवेदनासोबत जोडल्याचेही सांगण्यात आले आहे.

“पोलीस कर्मचाऱ्यांकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”

पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रमुख कर्तव्य कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट करण्यात आल्यास त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटले आहे.

संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया पोस्टची तातडीने चौकशी करून, पोस्ट आक्षेपार्ह व कायद्याचे उल्लंघन करणारी आढळल्यास संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, तसेच विभागीय चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या तक्रारीवर फर्दापूर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version