Spread the love

“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही”; शिंदेंचा परभणीतून विश्वास

‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ; दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात, २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

परभणी (प्रतिनिधी – रामचंद्र अन्नदाते) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीचे औचित्य साधून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ परभणीच्या भूमीतून करण्यात आला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष मदतीचा हात देण्यात आला.

मराठवाड्यासह परभणी जिल्हा दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात असताना केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता संकटग्रस्त कुटुंबांना प्रत्यक्ष मदत करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबांना मदत; मुलींना सायकली

कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिलाई मशीन, तर गरजू मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यामुळे संकटग्रस्त कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याच कार्यक्रमात मराठवाड्यातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

परभणीच्या विकासासाठी १२० कोटींचा निधी

परभणीच्या विकासासाठी यापूर्वी १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. परभणीत उद्योगधंद्यांना चालना मिळावी यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांना यापूर्वीच सूचना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिंदे म्हणाले, “सरकारी तिजोरी ही शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.”

संकटग्रस्त कुटुंबांशी साधला संवाद

दुष्काळ आणि आत्महत्येमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांतील महिला व तरुणींशी शिंदे यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. शासन आणि शिवसेना संकटाच्या काळात या कुटुंबांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.

हजारो नागरिकांची उपस्थिती

कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या सहभागामुळे ‘सेवा संकल्प अभियानाला’ मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version