‘वॉटर-गटर-मीटर’पुरते मर्यादित राहू नका; जनतेच्या सुख-दुःखातील ‘आपला माणूस’ बना
ना. गुलाबराव पाटील यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन; ‘अभ्यास, काम आणि संपर्क’ ही यशस्वी लोकप्रतिनिधीची त्रिसूत्री
जळगाव/भाईंदर (ठाणे), दि. ७ : “नगरसेवक म्हणजे केवळ ‘वॉटर-गटर-मीटर’ नव्हे. रस्ता, गटार, पाणी आणि वीज ही कामे करायचीच; मात्र त्यापलीकडे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख-दुःखात धावून जाणारा ‘आपला माणूस’ अशी ओळख नगरसेवकाने निर्माण केली पाहिजे. निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण लागते; मात्र पाच वर्षे जनतेच्या मनात राहण्यासाठी अभ्यास, काम आणि सातत्यपूर्ण संपर्क या तीन गोष्टी आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर (प.) येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित महानगरपालिका नगरसेवकांसाठी आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन ना. गुलाबराव पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. यावेळी त्यांनी नगरसेवकांशी संवाद साधत महापालिका कामकाज, निधी नियोजन, प्रशासनाशी समन्वय, जनसंपर्क, सभागृहातील भूमिका, शासकीय योजना तसेच पाणी बचतीबाबत मार्गदर्शन केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचाराचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधीच्या कामातून सेवाभाव दिसला पाहिजे. “प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवा. ज्येष्ठ नागरिक, युवक, व्यापारी तसेच महिला बचत गटांशी संवाद साधा. नगरसेवकाचे कार्यालय हे जनसेवेचे छोटे केंद्र बनले पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
अभ्यासाशिवाय सभागृहातील आवाज अपुरा
प्रत्येक नगरसेवकाने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, अर्थसंकल्प आणि निधीचे स्रोत यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
“महानगरपालिकेत पैसे नाहीत किंवा अधिकारी ऐकत नाहीत, एवढीच कारणे सांगून चालणार नाही. जनतेने तुम्हाला कारणे सांगण्यासाठी नव्हे, तर मार्ग काढण्यासाठी निवडून दिले आहे. सभागृहात आवाज जरूर उठवा; पण त्या आवाजाला अभ्यासाची जोड द्या. नुसता टेबल वाजवण्यापेक्षा हातात कागद, आकडे आणि नियम घेऊन प्रशासनाला उत्तर द्यायला भाग पाडा,” असे त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे असून, प्रभागातील प्रश्न समजून घेण्यासाठी नगरसेवकांनी प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“फेसबुकवर पन्नास पोस्ट टाकण्यापेक्षा प्रभागात अशी पाच कायमस्वरूपी कामे करा की पुढची वीस वर्षे लोक त्या कामाची आठवण काढतील. नगरसेवकाची खुर्ची पाच वर्षांची असते; पण चांगल्या कामाची आठवण पंचवीस वर्षांची असते. काम करा, संपर्क ठेवा, माणसं जोडा—तुमचं कामच तुमची ओळख सांगेल,” असे आवाहन पाटील यांनी केले.
पाणी बचत आणि जलस्रोत संवर्धनावर भर
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या योजनांचा संदर्भ देताना पाटील यांनी पाणी बचत, जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे आणि पाणीपुरवठा योजनांची योग्य देखभाल यावर भर दिला.
“नवीन योजना उभारणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि संवर्धनही महत्त्वाचे आहे. नगरसेवकांनी नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती निर्माण करावी,” असे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन
दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात अॅड. सुभाष काळे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व स्थानिक कायदे, अभिजित सामंत यांनी प्रभागस्तरीय संपर्क कार्यालय व नागरिक तक्रार निवारण, मंदार हळबे यांनी विविध समित्या व नागरी प्राधिकरणांशी समन्वय, प्रशांत पिसोळकर यांनी महानगरपालिका अर्थसंकल्प व निधी नियोजन, तर गणेश खणकर यांनी महापालिका सभेचे कामकाज व प्रभावी सहभाग याबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ध्रुवकिशोर पाटील यांनी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय, शिवम पांडे यांनी सोशल मीडिया व डिजिटल जनसंपर्क, तर पीयूष गिरगावकर यांनी महानगरपालिकेतील पायाभूत सुविधा, नागरी समस्या व सुशासन प्रकल्पांवर मार्गदर्शन केले.
अॅड. शेखर परदेशी व वैभव वाघ यांनी ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’ तसेच विविध शासकीय योजनांबाबत प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पांचाळ यांनी केले. शिवसेनेचे राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण शिबिराची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील आणि प्रशिक्षण विभाग प्रमुख सुरज आव्हाड यांनीही मार्गदर्शन केले. आनंद परांजपे यांनी आभार मानले.
