पारोळा शहरात अतिक्रमणांवर नगरपरिषदेचा हातोडा!
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची कारवाई; बसस्थानक, कजगाव नाका, व्यापारी संकुलासह विविध भाग अतिक्रमणमुक्त
पारोळा प्रतिनिधी (संदीप पाटील) : पारोळा शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, नाले तसेच शासकीय व नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने विशेष मोहीम राबविली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाने शहरातील विविध भागांत कारवाई करत अतिक्रमणे हटविण्यावर भर दिला. ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या मोहिमेंतर्गत नियोजित स्टेडियम परिसर, बसस्थानक परिसर, कजगाव नाका, स्वर्गीय मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल, पीर दरवाजा, राजीव गांधी नगर आणि इंदिरानगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळ्या ठेवणे, वाहतुकीची कोंडी कमी करणे, पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले.
कायदेशीर प्रक्रियेनंतर अतिक्रमणे निष्कासित
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १७९ (१), (३), १८० व १८१ अन्वये अतिक्रमणांची पाहणी, नोंदणी आणि आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना नियमानुसार सूचना व नोटिसा देऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिक्रमणे हटविण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुख्य रस्ते, बाजारपेठा, सार्वजनिक मार्ग, फुटपाथ आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. रस्त्यांवर अनधिकृतपणे साहित्य, हातगाड्या, फलक, शेड, ओटे किंवा अन्य वस्तू ठेवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या.
अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू राहणार
मुख्याधिकारी तुषार नेरकर म्हणाले, “शहरातील सार्वजनिक रस्ते आणि जागा या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी आहेत. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत राहणे तसेच शहराचे सौंदर्य आणि शिस्त कायम राखण्यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने करण्यात येईल. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे.”
अधिकारी-कर्मचारी पथकाचा सहभाग
या कारवाईत स्थापत्य अभियंता सुमित पाटील, रचना सहाय्यक साक्षी मराठे, आस्थापना प्रमुख अनिल तिदमे, लेखापरीक्षक दीपक महाजन, अंतर्गत लेखापरीक्षक सार्थक मोरस्कर, पाणीपुरवठा अभियंता संकेत कारले, कर निरीक्षक तथा प्रशासन अधिकारी संजय गीते, संकीर्ण विभागाचे महेश जोशी, स्वच्छता निरीक्षक दिलीप चौधरी आणि सभा लिपिक किशोर गणपत चौधरी सहभागी झाले.
तसेच संदीप बळीराम पाटील, परेश उत्तम चौते, गणेश माळी, राहुल प्रजापती, आकाश सौदागर, निर्भय मोरे, विश्वास पाटील यांच्यासह आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
