Spread the love

नशिराबादमध्ये विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

आसोद्यातील ४० वर्षीय व्यक्तीची ओळख पटली; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील जुन्या जीन परिसरातील शेतातील विहिरीत गुरुवारी (८ ऑक्टोबर) सकाळी एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख बंडू रामराव पाटील (वय ४०, रा. इंदिरानगर, आसोदा) अशी पटली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नशिराबाद पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नशिराबाद येथील जुन्या जीनजवळ धीरज भगवान पाटील यांचे शेत आहे. गुरुवारी सकाळी शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच शेतमालक धीरज पाटील यांनी तत्काळ नशिराबाद पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक कार्यवाही केल्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीजवळ आढळलेल्या आधारकार्डाच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. बंडू पाटील हे आसोदा येथील इंदिरानगर परिसरातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.

मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

मृतदेहाची अवस्था पाहता संबंधित व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूची नेमकी वेळ तसेच व्यक्ती विहिरीत कोणत्या परिस्थितीत पडली, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, मृतदेह वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. बंडू पाटील विहिरीत नेमके कोणत्या परिस्थितीत पडले, हा अपघात आहे की अन्य काही कारण आहे, या विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

शवविच्छेदन अहवाल आणि तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version